Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

विज्ञानवाहिनी

September 17, 2012


भूमिका : एकविसाव्या शतकाची वैज्ञानिक आव्हाने समर्थपणे झेलणार्‍या भारताच्या असंख्य खेड्यातील शालेय शिक्षण मात्र एकोणिसाव्या शतकातच अडखळलेले आहे. नागरी भारतात सेल्युलर फोन, संगणक, उपग्रह अशा स्वरूपात विज्ञान व माहिती तंत्रज्ञान खूप विकसित झालेले दिसते. पण खेड्यात अज्ञान, दारिद्रय, अंधश्रद्धा यांचा पगडा आणि पिण्याचे पाणी, वीज, रस्ते अशा पायाभूत सुविधांचा अभाव आहे.

ही शिखर-दरी स्वरूपातली विषमता ग्रामीण विद्यार्थ्यांच्या विज्ञान शिक्षणाद्वारे कमी करणे हे विज्ञानवाहिनीचे प्रमुख ध्येय आहे. प्रयोगाच्या माध्यमातून विज्ञान शिकावे आणि त्याचा आपल्या जीवनात योग्य वापर करावा हा विचार ग्रामीण विद्यार्थ्यात रुजविण्यासाठी फिरत्या प्रयोगशाळेद्वारे विज्ञानवाहिनी कार्य करीत आहे. भोळसट समजुती आणि जाचक अंधश्रद्धा यांच्याशी झगडण्याचा आणि विवेकवादाची कास धरण्याचा संदेश विज्ञानवाहिनी खेडोपाडी पोहोचवीत आहे.

वाटचाल : १४ जुलै १९९५ ला विज्ञानवाहिनीने फिरत्या प्रयोगशाळेद्वारे आपले काम सुरू केले. फिरती प्रयोगशाळा हे विज्ञानवाहिनीचे प्रमुख साधन आहे. वैज्ञानिक उपकरणे, टीव्ही. व्हीसीआर, विद्युत जनित्र, पाण्याची टाकी, टेबले अशा सोईसकट ही सुसज्ज प्रयोगशाळा कुठल्याही दर्गम गावात पोहोचून काही मिनिटातच आपले काम सुरू करते-शाळा एखाद्या गोदामत अगर देवळात भरली असली तरी.

संवाद आणि कृतिगट : कार्यकर्त्यांचा गट हे विज्ञानवाहिनीचे विशेष सामर्थ्य आहे. शास्त्र, उद्योग व्यवसाय, अध्यापन अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या या गटाचा एक ध्यास आहे. संधी अभावी वंचित राहिलेल्या ग्रामीण मुलांत विज्ञानाचा आणि वैज्ञानिक मनोवृत्तीचा प्रसार करणे. हा ध्यास आणि सेवावृत्ती हा विज्ञानवाहिनीच्या संवाद आणि कतिगटास एकत्र जोडणारा बंध आहे.

कार्यक्रम : शाळेची निकड, अनुदान, विद्यार्थी संख्या, स्थानिक सहकार्य यांचा विचार करून माध्यमिक शाळांची निवड होते. प्रत्येक शाळेसाठी पाच कार्यकत्यांचा एक गट ठरविला जातो. ठरल्या दिवशी हा गट प्रयोगशाळेसह शाळेत जातो. आठवी ते दहावीच्या ७० ते ८० मुलांसाठी वीस पंचवीस प्रयोगांचे आयोजन होते. काही प्रयोग मुले स्वत: करतात, बाकीचे पाहतात. शिवाय दृक श्राव्य फिती, स्वयंचलित आगगाडी इ. गोष्टी विद्यार्थी पाहतात. तसेच आरोग्य लैंगिक शिक्षण, स्वच्छता इत्यादींचा कार्यक्रमात समावेश केला जातो.

अतापर्यंत १६ वर्षात विज्ञानवाहिनीने २३०० पेक्षा जास्त शाळा भेटी केल्या आहेत. दरवर्षी सुमारे २००००० विद्यार्थ्यांना सैद्धांतिक मार्गदर्शन, प्रयोगात सहभाग, व्हिडिओ इत्यादींचा लाभ होतो. या काळात फिरत्या प्रयोगशाळेचा २००००० कि. मी. प्रवास झाला आहे. विद्यार्थ्यांनी उपकरणे हाताळावीत, प्रयोग करावेत, आवश्यक तशी शिक्षकांची मदत घ्यावी, प्रश्न विचारावेत, कुतुहल शमवावे, आणि संकल्पना समजाऊन घ्याव्या यासाठी विज्ञानवाहिनी ’’प्रयोग-प्रयत्न’’ शील आहे.

शाळाभेटींपलिकडे : सोळा वर्षांत विज्ञानवाहिनीचे काम बरेच वाढले आहे. मोठ्या शाळातून ‘‘विज्ञान मेळा’’ भरविला जातो, ज्यात निवडक विद्यार्थ्यांना प्रयोग समजावले जातात. मग आपल्या सह-विद्यार्थ्यांना ते प्रयोग समजाऊन सांगतात. प्रत्येकी साठ पुस्तकांची फिरती ग्रंथालये शाळांमधून वितरीत होत असतात. विज्ञानविचार नावाचे शण्मासिक विद्यार्थी व शिक्षकांसाठी प्रकाशित होत असते. दरवर्षी चारपाच शिक्षक शिबिरे व एक विद्यार्थी शिबिर भरविले जाते. प्रयोग साहित्य, देवराई निगा आणि संवर्धन, पाणलोट क्षेत्र विकास अशा प्रकल्पांसाठी स्थानिक प्रयत्नास जोड अशा स्वरूपात विज्ञानवाहिनीमार्फत मदत केली जाते.

भावी योजना : दुर्लक्षित ग्रामीण विभागात एक विज्ञान-केंद्र उभे करण्याचा विज्ञानवाहिनीचा प्रकल्प आहे. या केंद्रात विज्ञानप्रयोगिका, संग्रहालय आणि ग्रामीण विकासविषयक माहिती कक्ष यांचा समावेश असेल. अहमदनगर जिल्ह्यातील सुरोडी गावाच्या पाणलोट क्षेत्र विकासातही विज्ञानवाहिनी सहभागी आहे.

आवाहन : प्रयोगशाळेबरोबर ग्रामीण शाळांस शिक्षक-मार्गदर्शक या नात्याने भेट देणे, प्रयोगासाठी नाविन्यपूर्ण उपकरणे उपलब्ध करून देणे, शाळांची निवड करण्यात आणि स्थानिक व्यवस्थापनात मदत करणे, अनुरुप दृक श्राव्य फिती मिळवून देणे, देणगीच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य अशा अगर इतर कोणत्याही पद्धतीचा सहभाग करू इच्छीणारांनी पत्राद्वारे अगर दूरध्वनीवर संपर्क साधावा.

अध्यक्ष : पुष्पा मधुकर देशपांडे
सचीव : जयंत फाळके

VIDNYANVAHINI,
701 / B, "KSHITIJ", 87A / 1-1, Sahakarnagar No. 2, Pune 411 009.
Ph. (020) 24222127
E-mail : madhu36@yahoo.com
Website : http://www.vidnyanvahini.org

Global Marathi's Blog

Blog Stats
  • 34193 hits